विस्मृतीत गेलेले बोध
अवधूत वाघ
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५
पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं
किराणा मालाचं एक मध्यम आकाराचं दुकान होतं. अतिशय
प्रामाणिकपणे ते धंदा करत. आपला माल चोख व भेसळमुक्त असावा याकडे त्यांचा कटाक्ष होता. जास्त फायदा
न घेता माफक दरात ते आपल्या दुकानातील माल विकत असत.
त्यामुळे त्यांच्या दुकानावर नेहमीच गर्दी असायची. सहसा
उधारी न देणारे काळे शेठ अतिशय अडचणीत असलेल्या व नेहमीच्या ग्राहकाला मात्र यात अपवाद करत.
तालुक्यापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेलं सोनगाव हे काळे शेठ यांचा मूळ गाव. तिथेच त्यांचं घर
पण होतं व थोडीफार शेतजमीनही. अर्थात काळे शेठ दुकान
पाहत असल्यामुळे शेती पाहण्यास त्यांना वेळच नव्हता व त्यांचे वडील बंधू गोपाळराव
हेच ती शेतजमीन कसत. आपल्याकडे असलेल्या एका दुचाकीवरून घर ते दुकान व दुकान ते घर
असा रोजचा प्रवास करीत.
काळे शेठ निर्व्यसनी होते. वारकरी होते. गेल्या २१ वर्षात त्यांची आषाढीची
वारी एकदाही चुकली नाही. मधून मधून आपला मेहुणा सुधीर नलावडे यांच्या ताब्यात दुकान देऊन ते देवदर्शनालाही
सहकुटुंब जात. देवदर्शनाच्या निमित्ताने फिरणं होतं, वेगवेगळे
प्रदेश पाहून होतात व मनाला विरंगुळही मिळतो म्हणून व काही वेळा काळे शेठ यांची
पत्नी रुक्मिणी बाई यांच्या आग्रहास्तव देखील काळे शेठ
प्रवासाला निघत.
डिसेंबर महिना हा तसा थंडीचा व त्यामुळे त्या प्रसन्न
वातावरणात दोन-तीन दिवस कुठेतरी बाहेर जाऊन यावं, देवदर्शन करावे असं जसं रुक्मिणीबाईंना
वाटलं तसंच काळे शेठना ही वाटल. त्यांनी तसं रुक्मिणीबाईचा
भाऊ सुधीर याला बोलून ही दाखवलं. दोन-तीन दिवस मी
दुकान बघीन असे ज्यावेळी सुधीरने आश्वासन दिल त्यावेळी काळे शेठनी गाणगापूरला
जायचं नक्की केलं. सोनगाव वरून गाणगापूर काही फार लांब
नव्हतं. सहा-सात तासाचाच प्रवास होता. त्यामुळे गाणगापूरला सकाळी निघायचं. संध्याकाळी
देवदर्शन करून रात्री तिथेच मुक्काम करायचा व दुसऱ्या
दिवशी दुपारचं जेवण जेवून परत रात्रीपर्यंत
घरी यायचं असा प्लान ठरला व त्याप्रमाणे काळे शेठ यांनी प्रवासासाठी एक महिंद्रा कंपनीची जीप बुक
केले केली.
चला, हेही काही फारसे वाईट नव्हते. दोन-चार माणसं वाढली तरी महिंद्राची जीप
एक दणकट गाडी होती. त्यामुळे ही तेरा माणसं सुद्धा थोडीशी
गर्दी असून का होईना त्यात बसू शकली असती. अडचण झाली असती. पण प्रवास खूप लांबचा नसल्यामुळे व सर्व माणसे सुद्धा जवळच्या नात्यागोत्याची
असल्यामुळे प्रवास फारसा असह्य झाला नसता. त्यामुळे कोणीच
काही बोलले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच घर सोडायचं असं ठरलं
व त्याप्रमाणे संपूर्ण प्रवासाची आखणी करण्यात आली. पण रात्री दहा वाजता अचानक सोमेश्वरचा फोन आला. काळे शेठने सोमेश्वरकडून
गाडी भाड्याने घेतली होती. तो त्याचा व्यवसाय होता.
सोमेश्वरने जीप गाडी आधी कोणाला तरी
भाड्याने प्रवासासाठी दिली होती. ती त्या रात्री परत
येण्याची अपेक्षा होती. परंतु ज्याने ती गाडी भाड्याने घेतली
होती त्याने अचानक आपला प्रवास एक दिवसांनी वाढवला. त्यामुळे
जीप त्या रात्री येणार नव्हती व त्यामुळे जीप दुसऱ्या दिवशी काळे साहेबांसाठी उपलब्ध
नव्हती.
आता आली का पंचाईत. आता काय करणार. प्रवासाला जाण्यासाठी सगळी तयारी झाली होती पण गाडीच नव्हती.
सोमेश्वरने काळे शेठ न सांगितलं की जीप
ऐवजी दुसरी स्कॉर्पिओ गाडी घेऊन जा. तीच केवळ उपलब्ध आहे. प्रवासाला जाण्यासाठी सगळी
तयारी झाली होती. लोक उत्साही होते.
मुलं खुश होती. अशावेळी आपला प्रवास कॅन्सल करून सर्वांचा
हिरमोड करायचा की थोडासा त्रास सहन करून मिळेल त्या गाडीतून प्रवासाला जायचं हा
काळे शेठ समोर प्रश्न होता. त्यांनी रुक्मिणीबाईंना विचारलं
देखील. रुक्मिणीबाई तर अधिक उत्साही.
त्या म्हणाल्या काय फरक पडतो? थोडासा त्रास होईल. मुलांना मांडीवर घेऊ. थोडं सामान कमी घेऊ. बसू कसं तरी. पण प्रवासाला जायचं. आता कॅन्सल नको करू या.
काळे शेठ ने आपल्या बायकोच हे म्हणणं मान्य केलं व
थोड्या कमी क्षमतेची का असेना गाडी आहे ना? त्यांन निघू.
असं ठरवून त्यांनी सोमेश्वरच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
ठरल्याप्रमाणे हि १३ जण म्हणजे ड्रायव्हरसहित
१४ जण प्रवासाला निघाली.
गाडी खचून भरली होती. ड्रायव्हरच्या बाजूला स्वतः पांडुरंग
शेठ, चंदन व अनुप दाटीदाटीने बसले होते. उरलेले १० जण पाठीमागे अगदी
एकमेकांना खेटून व गच्च गचडी करून बसले
होते. या १३-१४ जणांचं दोन दिवसाला लागणार सगळं सामान गाडीच्या
वर असलेल्या कॅरियरवर नीट बांधून ठेवण्यात आलं होतं आणि अगदी सकाळी सात म्हणजे
सातला गाडी प्रवासाला निघाली.
दुर्दैवाने चार-साडेचार तासाच्या प्रवासानंतर
घाटामध्ये वळण घेत असताना समोरून ओव्हरटेक करून येणाऱ्या एका ट्रकपासून आपला बचाव
करण्यासाठी ज्यावेळी ड्रायव्हरने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ओव्हरलोड
असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा ब्रेक लागला नाही. प्रसंगावधान
राखून ड्रायव्हरने स्टिअरिंग व्हील डावीकडे फिरवल्यामुळे टक्कर टळली पण गाडी रस्ता
सोडून बाजूच्या शेतात जाऊन थडकली. गाडीचं
खूप नुकसान झालं. कॅरियरवर ठेवलेलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलं. पण
सुदैव हे की गाडीचा वेग कमी असल्यामुळे जीवितहानी झाली नाही किंवा फारशी गंभीर
दुखापत देखील झाली नाही. परंतु ड्रायव्हर सहित प्रत्येकाला
काही ना काही तरी जखम झाली होती.
सीता आता उपवर झाली होती. तिचे वडील राजा जनक यांना आता
सीतेच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. आपल्या लाडक्या कन्येला सुंदर, शक्तिशाली, पराक्रमी,
राजपुत्र ‘वर’ म्हणून मिळावा अशी
त्यांची मनोमन इच्छा होती. आपल्या दरबारात असलेल्या
ऋषीमुनींना व पुरोहितांना, पंडितांना त्यांनी याबाबत काय
करावे अशी विचारणा करून त्यांचा सल्ला घेतला होता. शेवटी
आपल्या सीतेला तिच्या इच्छेनुरूप वर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे असे सर्वानुमते
ठरले.
राजा जनकाने सीतेचे स्वयंवर करायचे ठरवले पण या
स्वयंवरात काय अट ठेवायची याबाबत कित्येक दिवस विचार करूनही राजा जनक कोणत्याही
ठोस निर्णयात येत नव्हते. शेवटी त्यांनी याबाबत सीतेलाच विचारायचं ठरवलं. शेवटी सीताच ती. प्रत्यक्ष भूमातेची कन्या. अतिशय तेजस्वी, सुंदर पण तेवढीच चपळ, बलवान व हुशार. त्यामुळे तिचं उत्तर किंवा अट
देखील तेवढीच महत्त्वाची, एवढंच नव्हे तर कठीण असणार याची
राजा जनकाला थोडी कल्पना देखील होती.
सीता म्हणाली की मला पृथ्वीतलावावरील सर्वात बलवान
पुरुषाशी लग्न करण्याची इच्छा आहे. हा पुरुष बलवान आहे की नाही याची
परीक्षा या स्वयंवरात घेतली जाईल. आणि जो पुरुष भगवान
शंकराने राजा जनकाला दिलेले 'पिनाक' धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावेल व त्या
प्रत्यांचेच्या ध्वनीने स्वयंवराचा मंडप कंप पावेल अशा पुरुषाशी मी लग्न करीन.
आपल्या शक्ति पेक्षा आपण ज्यावेळी अधिक कठीण गोष्ट
करायला जातो त्यावेळी ती गोष्ट जर काही काळासाठी होत आहे असं जरी दिसत असलं तरी
त्यातून अपघात होऊ शकतात हे ना काळे शेठच्या लक्षात आलं ना रावणाच्या.
सुरुवातीला धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या
रावणाला असं थोडंसं वाटलं होतं की हे धनुष्य खूप जड आहे. कदाचित आपण ते उचलू शकणार नाही. पण असं असूनही तो प्रयत्न करायला गेला. धनुष्य तर
उचलल गेलच नाही पण तो पालथा पडला. धनुष्य त्याच्या अंगावर
पडलं आणि त्याचा अपमान झाला. काळे शेठना रावणाच्या सीता
स्वयंवराची ही गोष्ट माहीत होती. त्यांच्या आईने लहानपणी ही
गोष्ट त्यांना सांगितली होती. पण या गोष्टीतील बोध सांगण्याची शेवटी ज्यावेळी
वेळ आली त्यावेळी काळे शेठ गाढ झोपून गेले होते. त्यामुळे
आपल्या कुवतीहून मोठी गोष्ट करणं धोकादायक आहे हा बोध त्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे केवळ सात -आठ माणसं बसू शकतील अशा स्कॉर्पिओ
गाडीमधून १३-१४ माणसं नेण्याचा त्यांचा निर्णय धोकादायक ठरला व
त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळाले.
सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५
रावणाच्या
अतृप्त ईच्छा
आपण काहीतरी उद्योग करावा, धंदा करावा असं लक्ष्मण राव जोशी साहेबांना त्यांच्या
तरुणपणी नेहमी वाटायचं. पण सुदैवाने त्यांना खूप तरुणपणीच चांगली 'सरकारी' नोकरी लागली व त्यांचे हे उद्योग-धंदा
करण्याचे स्वप्न हवेत विरले. जॉब आरामाचा होता व मोठ्या अधिकाराचा ही. नियमितपणे दर एक तारखेला येणारा
पगार, ऑफिसमध्ये जायला-यायला सरकारी गाडी आणि शासकीय वसाहतीत
एक मोठा फ्लॅट यामुळे जोशीसाहेब ‘इंडस्ट्री डिपार्टमेंट’ मध्ये जे चिकटले ते वयाच्या 58 व्या वर्षीच निवृत्त
होईपर्यंत चिटकून राहिले.
परंतु आपल्या मनातली धंदा करावा ही इच्छा त्यांनी अनेकदा त्यांचा मुलगा राहुल याला बोलून दाखवली होती. राहुल इंजिनीयर होता. हुशार होता व मेहनती देखील होता. त्यालाही वाटे की नोकरीत काय लागून राहिल आहे? मोठं व्हायचं असेल तर धंदाच करण भाग आहे. त्यामुळे तो नोकरी करण्याच्या भानगडीतच पडला नाही व त्याने आपला छोटा-मोठा धंदा सुरू केला. जसं सर्वांच्या बाबतीत घडतं तसंच त्याच्या बाबतीत घडलं. छोटा-मोठा धंदा तर कोणीही करेल पण जर धंदा वाढवायचा ठरवला तर मात्र थोड्या ओळखी हव्यातच. नशिबाने जोशीसाहेब इंडस्ट्री डिपार्टमेंट मध्येच मोठे अधिकारी होते. अनेक कंपन्यांशी त्यांचा संबंध यायचा. अनेक कंपन्यांना त्यांनी मदत पण केली होती. कंपन्यांच्या अडचणीच्या वेळी जोशीसाहेब त्यांना मदत करायचे त्यामुळे त्यांचे नावही चांगले होते. राहुल नेहमी बाबांना सांगायचा की "बाबा, अ'लंका'र कंपनीमध्ये माझ्या धंद्याला काम मिळू शकत. जरा तुम्ही बोललात तर बर होईल". जोशी साहेब नेहमीच बिझी असायचे. राहुलला ते काही ना काही कारण द्यायचे. अरे आज, अरे उद्या फोन करतो रे. अरे परवा भेटायला जाऊ रे. अरे पुढच्या आठवड्यात त्याला बोलून घेऊ रे. असं काही ना काही सांगत. शेवटी राहुलच कंटाळला आणि त्यांनी बाबांना विचारणच बंद केल.
राहुलचा धंदा टुकूटुकू चालू होता आणि यथावकाश लक्ष्मण राव जोशीसाहेब 'इंडस्ट्री डिपार्टमेंट' मधून निवृत्त झाले. आता काय, जोशी साहेबांना वेळच वेळ होता. एक दिवस त्यांनी स्वतःहून राहुलकडे विषय काढला आणि म्हणाले चल, आपण त्या अ'लंका'र कंपनीच्या मालकाला भेटूया आणि तुझ्या धंद्याबद्दल बोलू या. जोशी साहेबांनी आपल्या डायरीतून त्या अ'लंका'र कंपनीचे मालक बालाजी लंकेश्वरन यांचा नंबर शोधून काढला व आपल्या मोबाईल वरून त्यांना लावला. टेलिफोनवर तिकडून जोशी साहेबांच स्वागत झालं आणि 'कधीही चहा प्यायला या' असं निमंत्रणही मिळालं. या निमंत्रणाने खुश झालेले जोशीसाहेब दुसऱ्याच दिवशी राहुलला घेऊन त्यांच्या घरापासून 18 किलोमीटर लांब असलेल्या अ'लंका'र कंपनीच्या फॅक्टरीत गेले.
अ'लंका'र कंपनीचे मालक बालाजी लंकेश्वरन त्या दिवशी खूप बिझी असावेत. त्यामुळे जोशी साहेबांना पाऊण तास त्यांची वाट पहावी लागली. यावेळेत लंकेश्वरननी आपल्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या चहापाण्याची व सोबत बिस्किटांची सोय केली होती ही त्यातल्या त्यात जोशी साहेबांना खुश करणारी गोष्ट होती. पाऊण तासानंतर जोशी साहेब लंकेश्वरनच्या केबिनमध्ये राहुल सोबत घुसले त्यावेळी लंकेश्वरननी 'या कानापासून त्या कानापर्यंत' हसून त्यांचं स्वागत केलं व त्यांना थांबून राहायला लागल्याबद्दल खेदही व्यक्त केला. थोडा वेळ अवांतर गप्पा झाल्यानंतर जोशी साहेबांनी राहुलच्या धंद्यासंदर्भातील विषय काढला. “हो-हो, अवश्य-अवश्य” म्हणत लंकेश्वरन नी त्यांना भले मोठे लाल लाल गाजर हातात दिले व धंद्याचा हा भाग त्यांचा पार्टनर बिभीषण पटेल पाहतो असे सांगून 'मी माझ्या पार्टनरशी बोलून राहुलला फोन करून कळवतो व त्यांची भेट घालून देतो' असे आश्वासनही दिले.
या गोष्टीला आता तीन वर्षे पूर्ण होत आली. आजपर्यंत राहुलला बालाजी लंकेश्वरन चा फोन आला नाही. जेव्हा कधी राहुलने वा जोशी साहेबांनी लंकेश्वरन ना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या पीए ने बालाजी लंकेश्वरन जागेवर नाहीत असाच निरोप दिला.
राम-रावण युद्धाच्या शेवटी रावण धारातीर्थी पडला होता व शेवटच्या
घटका मोजत होता अशावेळी लक्ष्मणाला थोडासा गर्व झाला होता.
आपले बाहू फुगवून, छाती पुढे काढून व मान वर करून तो
आजूबाजूला पाहत होता. प्रभू रामाच्या हे लक्षात आल्यानंतर
त्याने लक्ष्मणाला म्हटले “लक्ष्मणा,
युद्ध आता संपले आहे. रावणही आता शेवटच्या घटका मोजत आहे. जरी तो आपला शत्रू होता तरी तो एक महान योद्धा होता. शिवभक्त होता. लंकेचा राजा होता. युद्ध संपले आणि वैरही संपले. तू आता तो जेथे पडला
आहे तेथे जा, बघ व ऐक तो काय बोलतोय ते. कदाचित मृत्यूपूर्वी तो तुला काही
महत्त्वाचं सांगेल सुद्धा”
लक्ष्मणाला अशा वेळी रावणाकडे जाणे व त्याला भेटणे काही
रुचले नाही. परंतु मोठ्या
भावाची, प्रत्यक्ष प्रभू श्री रामाची आज्ञा आहे म्हणून
नाईलाजाने का होईना लक्ष्मण रणभूमीकडे, जिथे रावण धारातीर्थी
पडला होता तिथे पोहोचला.
लक्ष्मणाला पाहताच मरणासन्न रावण थोडासा सावरला व त्याने लक्ष्मणाला येण्याचे कारण विचारले. “रामाची आज्ञा आहे
म्हणून आलो. बाकी काही नाही.
मरण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. मी
तुमचा निरोप श्रीरामाला सांगेन” असं थोडंस उर्मट उत्तर
लक्ष्मणाने दिल.
रावण खिन्न हसला व म्हणाला “हे लक्ष्मणा, अरे खूप
इच्छा होती रे, हा सतत खवळणारा समुद्र कायमचा शांत करून टाकावा. त्याच्या पाण्याचा लोकांना काहीही उपयोग नाही रे. ते सार खारट पाणी गोड करून टाकावं. पण आज करू उद्या करू असं म्हणत ते राहूनच
गेलं. संपूर्ण खारा समुद्र गोड करण्याची शक्ती होती रे
माझ्याकडे. पण जे राहून गेल ते राहून गेलं”.
“असं
वाटायचं की या पृथ्वीवरच्या सर्व मानवांना अगदी सहजगत्या स्वर्गापर्यंत पोहोचता यावं म्हणून पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक
शिडी तयार करावी. पण आज करू, उद्या करू
असं म्हणत ते राहूनच गेल. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत शिडी
बांधायची शक्ती होती रे माझ्याकडे. पण ते राहूनच गेलं. लक्ष्मणा, आज मीच असा शक्तीहीन अवस्थेत इथे पडून
आहे. आता मला तर फारसं बोलता ही येत नाही. आता मनात जी काम करायची होती ती राहून गेली. आता मी
ती कशी काय करू?”
जोपर्यंत आपल्याकडे शक्ती असते तोपर्यंतच कार्यसिद्धी होऊ शकते, काम होऊ शकत. आपण निर्णय घेऊ शकतो. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो. एकदा का आपण शक्तीहीन झालो किंवा वेळ टाळून गेली की मनात असलं तरी आपण ती काम करू शकत नाही. एखाद्या मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला विचारा. जी त्याच्या कार्यकाळात काम राहून गेली आहेत तो ती आता करू शकतो का? त्याचे उत्तर नाही असच असणार. कारण आता त्याच्यातील शक्ती निघून गेली आहे. जी खुर्चीची पॉवर होती ती निघून गेली आहे. जर एखाद्याला नर्मदा परिक्रमा करायचं असेल तर त्याने ती तरुण वयातच केली पाहिजे चारधाम यात्रा देखील तरुणपणातच केली पाहिजे. आज करू, उद्या करू म्हणून जर या यात्रा राहून गेल्या तर ज्या वयात चालणं अशक्य होतं, थोडसं चाललं तर धाप लागते, अनेक रोगांनी शरीरात घर केलेलं असतं अशावेळी या यात्रा आपण करू शकू का? म्हणून आजचं काम आजच केलं पाहिजे आणि जमलं तर उद्याचही काम आजच संपवलं पाहिजे. नाहीतर आपली गतदेखील धारातीर्थी पडलेल्या रावणासारखी होऊ शकते.
रात्री झोपायच्या आधी लक्ष्मणराव जोशी साहेबांना त्यांचे बाबा नेहमी चांगल्या चांगल्या कथा सांगत. बहुदा रावणाची ही कथा सांगायची त्यांच्याकडून राहून गेलेली असावी.
रविवार, २ फेब्रुवारी, २०२५
श्रावण
बाळाचे खरे खलनायक
रात्री
साडेदहा वाजता आपल्या चिन्मयी या एक वर्षाच्या नातीला खांद्यावर थापटून थोपटून
झोपवल्यानंतर आपण स्वतः झोपेला जायच्या तयारीत असलेल्या यशवंत रावांचा फोन वाजू
लागला. एवढ्या रात्री कोणाचा फोन
आहे? असा विचार करत यशवंत रावांनी फोन उचलला त्यावेळी दापोली मधील त्यांच्या
गावावरून त्यांचे काका दुसऱ्या बाजूने बोलत होते. यशवंत राव व त्यांचे मोठे
अविवाहित बंधू शंकर राव, यशवंत रावांची पत्नी विद्या ताई, विवाहित मुलगा सुदेश व सून मंगल
हे सारे एकत्र पनवेलमध्ये राहायचे तर त्यांचे ८८ वर्षाचे वृद्ध वडील
वसंत राव दापोली मधील त्यांच्या गावातील वडिलोपार्जित
घरात आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहायचे. यशवंत रावांनी आपल्या वडिलांना म्हणजे वसंत रावांना, पनवेल येथे आपल्या बरोबरच राहावे म्हणून अनेक वेळा आग्रह केला, विनंती केली पण पत्नीच्या निधनानंतर वसंत राव हट्टाने आपल्या गावीच
राहायला गेले. वसंत रावांचं लहानपण गावी गेलं असल्यामुळे
त्यांना गावची ओढ होतीच पण त्याचबरोबर पनवेल मधलं मुलाच छोटसं घर, त्यात अनेक माणसं,
आता त्यांना तिथे गर्दी-गर्दी वाटू लागली होती.
फोनच्या
दुसऱ्या बाजूला यशवंत रावांचे काका,
सुधाकर काका होते. अर्ध्या-एक तासापूर्वी वसंत रावांना अचानक छातीत दुखू लागलं होतं म्हणून
सुधाकर काकांनी त्यांना ताबडतोब दापोली मधल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांचे उपचार चालू होते. तसं वय झालं
होतं. प्रकृती नाजूक होती पण फारशी चिंता करायचं काही
कारण नव्हतं.
फोनवरचा
निरोप ऐकून यशवंत राव अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या घरच्या सर्वांना ही बातमी
कळवली. सगळेच चिंताक्रांत झाले.
पुढे काय करायचं हे ठरवू लागले. घरात शंकर राव
सर्वात मोठे. त्यांनी आग्रह धरला की ताबडतोब गावी
गेले पाहिजे. बाबांवर म्हणजे वसंत रावांवर ताबडतोब
चांगले उपचार होतात की नाही हे पाहिले पाहिजे. एवढे
होईस्तो रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. आता
एवढ्या रात्री पनवेलवरून दापोलीला जायचं म्हणजे कसं जायचं हाच मोठा प्रश्न होता.
रात्री कोकणात जाणाऱ्या बसेस कधीच निघून गेल्या होत्या.
शेवटची सावंतवाडी पॅसेंजर पण पुढच्या दहा मिनिटात सुटणार होती. आणि दहा मिनिटात पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत जाणं शक्यच नव्हतं.
अशावेळी कारनेच
गावी जाण हा एकमेव मार्ग होता.
यशवंत रावांनी कोणीही ड्रायव्हर ठेवला नव्हता. तसा
कारचा फारसा उपयोगही नव्हता. अतिशय क्वचित प्रसंगी यशवंत रावांचे कुटुंबीय जवळपास कुठे जाण्यासाठी किंवा
एखादा लग्न समारंभ असेल तर त्याला जाण्यासाठी कारचा वापर करीत. यशवंत रावांव्यतिरिक्त
त्यांच्या घरात फक्त त्यांच्या मुलालाच गाडी चालवता येत असे आणि आज तोही त्याच्या
ऑफिसच्या कामानिमित्त नाशिकला निघून गेला होता.
आता गाडी स्वतः चालवत दापोलीला गावी जाणं हा एकमेव मार्ग
यशवंत रावांसमोर होता. मोठे बंधू शंकर राव यांचा
ताबडतोब निघण्याचा आग्रह तर होते पण शंकर राव स्वतः आजारी असल्यामुळे ते
त्यांच्याबरोबर येऊ शकत नव्हते.
शेवटी
निर्णय झाला व यशवंत राव स्वतः एकटेच गाडी घेऊन दापोलीला गावाकडे निघाले. पनवेल ते दापोली हे साधारण २००
किलोमीटरचे अंतर कारने कापायला पाच तास तर नक्कीच लागणार होते. त्यामुळे सकाळी साडेचार-पाच पर्यंत आपण पोहोचू असे यशवंत रावांना वाटले आणि ते गाडी घेऊन
गावाकडे निघाले. चिंताक्रांत, मनात काळजी व डोळ्यात नाही म्हटलं तरी थोडीशी झोप असलेले ६२
वर्षाचे यशवंत राव मुंबई-गोवा महामार्गावरून दापोलीकडे निघाले.
मनात अनेक शंका उत्पन्न होत होत्या.
विचारांच काहूर माजलं होतं आणि अशा तंद्रीत असतानाच जे होऊ नये तेच झालं.
रस्त्यावर असलेला
एक मोठा खड्डा रात्र असल्याने अंधारात यशवंत रावांना दिसला नाही. त्या खड्ड्यात गाडी घुसून पुन्हा जेव्हा वर
आली तेव्हा यशवंत रावांचा गाडीवरचा कंट्रोल गेला होता. ६०-७०
च्या स्पीडने धावणारी ती गाडी
अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडावर आदळली आणि अपघात झाला.
सुदैवाने डोक्याला मार लागला, पाय
फ्रॅक्चर झाला व एका बरगडीला दुखापत झाली एवढ्यावर वाचलं म्हणायचं पण
यशवंत रावांच्या जीवाला धोका झाला नाही. पुढे
चार-पाच दिवसातच यशवंत रावांचे वडील वसंत राव हे ठीक होऊन घरी
परतले पण यशवंत राव मात्र दोन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
प्रभू रामचंद्रांचे वडील आणि अयोध्येचे 'महाराज दशरथ’ यांना देखील इतर सर्व राजांप्रमाणे शिकारीचा छंद होता. त्यावेळी शिकार हा एक क्रीडा प्रकार होता. आपली नेमबाजी, धनुर्विद्या, धाडस व साहस दाखवण्याचा तो एक प्रकार होता. शिकार करतेवेळी कित्येक वेळा जीव धोक्यात घालावा लागायचा. त्यामुळे असा धोका पत्करण्याच्या तयारीचाही कस लागायचा. एक दिवस अशाप्रकारे शिकार करायला निघालेले राजा दशरथ त्यांच्यासोबत आलेल्या इतर मंडळींपासून वेगळे पडले. रात्र झाली. त्यामुळे जंगली जनावरांपासून बचाव करण्यासाठी राजा दशरथ एका झाडावर चढून बसले. झाडापासून जवळच एक पाणथळ जागा होती. तलावच होता म्हणाना. त्या तलावावर रात्री पाणी पिण्यासाठी जंगली जनावरे देखील येत. त्यामुळे रात्री एखादी चांगली शिकारही होऊ शकते हे लक्षात ठेवून राजा दशरथ आपल्या धनुष्याला प्रत्यंच्या लावून अगदी सावध बसले होते.
त्याचवेळी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना काशीयात्रा घडवून आणण्यासाठी त्यांना कावडीत बसून
नेणारा श्रावण बाळ तेथूनच चालला होता. रात्र झाली म्हणून
त्याने एका सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता. रात्री आई-वडिलांना तहान लागली. त्यांनी
श्रावण बाळाकडे पाणी पिण्याची इच्छाही बोलून दाखवली. सोबत असलेल्या मडक्यातली पाणी संपले होते.
अशावेळी कुठून तरी पाणी आणणे व आई-वडिलांची इच्छा पूर्ण करणे हे श्रावण बाळाला आपले कर्तव्य वाटले. तसं त्यावेळी ती सुरक्षित जागा सोडून रात्रीच्या किर्र अंधारात आणि
विशेषतः त्या भयभीत करणाऱ्या अपरिचित जंगलात पाणी शोधायला जाणं धोक्याचंच होतं. पण
श्रावण बाळाने हा धोका पत्करायचं
ठरवलं. आणि तो एक मातीच मडकं घेऊन पाणी शोधायला
बाहेर पडला. काही वेळातच त्याला जवळच असलेला एक
तलाव दिसला. त्या तलावातून मडक्याच्या साहाय्याने
पाणी भरत असताना आलेला आवाज जवळच असलेल्या राजा दशरथाच्या कानी पडला. राजा दशरथाला वाटले की कोणीतरी जंगली जनावर पाणी पित आहे.
आवाजाच्या दिशेने राजा दशरथाने जो
बाण सोडला तो श्रावण बाळाला वर्मी लागला व तो घायाळ झाला. पुढे काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहित
आहे.
दुसऱ्या गोष्टीत रात्री आई-वडिलांना तहान लागली म्हणून भावनेच्या आहारी जाऊन अनोळखी निबिड अरण्यात जंगली श्वापदे असू शकतात हे माहीत असून सुद्धा श्रावण बाळ पाणी आणायला गेला. रात्री तसं गरम तर नक्कीच होत नसतं. रात्रभर पाणी मिळालं नाही म्हणून आई-वडिलांचं फार काही बिघडलं असतं असं नाही. त्यामुळे पाण्यासाठी रात्रभर आई-वडील थांबले असते तरी चाललं असतं. पण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्रावण बाळाकडे पाण्यासाठी हट्ट धरला व त्याला संकटात लोटलं. श्रावण बाळाने देखील डोक्याने विचार न करता भावनेने विचार केला व तो संकटाला स्वतःहून सामोरा गेला. यात जशी श्रावण बाळाची चूक आहे तशी श्रावण बाळाच्या आई वडिलांची अधिक चूक आहे. राजा हरिश्चंद्राच्या बाणाने श्रावण बाळ मृत्युमुखी पडला हे जरी सत्य असलं तरी जर राजा हरिश्चंद्र तिथे नसता तर एखाद्या वाघ, सिंह किंवा कोल्या-लांडग्याच्या कळपाने देखील श्रावण बाळाचा फडशा पाडला असता किंवा सर्प दंशाने देखील श्रावण बाळाचा मृत्यू होवू शकला असता हे देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे श्रावण बाळाच्या कथेत राजा हरिश्चंद्राला खलनायक बनवणं मला तरी मान्य नाही. खरे खलनायक स्वतःच्या तहानेवर काबू न ठेवू शकणारे व ऐन रात्री आपल्या मुलाला आपल्या हट्टापायी संकटात घालणारे श्रावण बाळाचे आई वडीलच आहेत.
तर
पहिल्या गोष्टीत यशवंत रावांना हट्टापायी ऐन रात्री एकटे कार
चालवत गावी पाठवणारे त्यांचे कुटुंबीय खलनायक आहेत.
८८ वर्षाच्या वडिलांना यशवंत रावांनी
आपल्याबरोबर राहावं म्हणून सांगितलं होतं. पण वसंत रावांनी
गावीच राहायचं ठरवलं. हा त्यांचा निर्णय होता आणि त्या निर्णयांबरोबर येणाऱ्या चांगल्या
वाईट गोष्टींना तेच जबाबदार होते. ८८
व्या वर्षी वृद्धांची तब्येत वर-खाली होणारच. अशा
वेळी आपण तिकडे ताबडतोब पोहोचल्यानंतर त्यांच्या तब्येतीत आपण काही फरक घडवून
आणणार आहोत का? आपण त्यांना काही वेगळे उपचार देणार आहोत
का? आपण त्यांचे प्राण वाचवणार आहोत का? या सर्व प्रश्नांची नकारात्मक उत्तरे असून देखील केवळ लोकोपवादासाठी,
इतर कुटुंबीयांना बरे वाटावे म्हणून किंवा कोणी आपल्याला नाव
ठेवू नयेत म्हणून रात्रीच्या प्रवासाचं अकारण धाडस करणारे यशवंत राव व त्यांचे
पनवेलमधील कुटुंबीय या अपघाताला जबाबदार आहेत.
अपघात घडतात त्याला जी अनेक कारणे असतात त्यातील मुख्य कारण म्हणजे एक, अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होणे. दोन, अशा परिस्थितीला पोषक असे वातावरण तयार होणे आणि तीन म्हणजे तारतम्य भावाच्या अभावाने आतताई निर्णय घेऊन अपघाताला स्वतःहून आमंत्रण देणे.
प्रसंग
सर्वांवर येतात. प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचे असते. तारतम्याने विचार करायचा असतो. मन आणि
बुद्धी दोन्ही शाबूत ठेवून निर्णय घ्यायचा असतो. जेव्हा
मन बुद्धीपेक्षा वरचढ होते त्यावेळी बहुतेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात पण
जेव्हा बुद्धीने निर्णय घेतले जातात त्यावेळी ते अनेक वेळा अचूक करतात ठरतात.
कोणताही निर्णय घेताना त्या निर्णयामागे असलेल्या धोक्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. संकटे ठाई-ठाई उभी असतात. ती आपण टाळू शकत नाही किंवा ती सारी संकटे नष्टही करू शकत नाही. परंतु आपल्या मार्गात ही संकटे येणार नाहीत असा मार्ग निवडण मात्र आपल्या हातात असतं. हा मार्ग जरी पूर्णपणे संकट मुक्त नसला तरी आपण बऱ्याच प्रमाणात या मार्गावरील अनेक संकटे कमी करू शकतो व जोखीमही कमी करू शकतो.
यशवंत रावांनी रामायणाच्या सुरुवातीलाच येणारी श्रावण बाळाची कथा ऐकली होती. ती कथा ऐकताना त्यांना रडूही कोसळले होते. त्या श्रावण बाळाच्या वयोवृद्ध आई-वडिलांबद्दल त्यांना अतिव सहानुभूती देखील वाटली होती. पण श्रावण बाळाच्या या कथेतील खलनायक ऐन जंगलात असताना पाण्यासाठी रात्री-अपरात्री मुलाकडे हट्ट धरणारे श्रावण बाळाचे आई-वडीलच होते हे यशवंत रावांच्या लक्षात आले नव्हते. अशा हट्टांकडे, विशेषत जो हट्ट पुरवताना आपला जीव धोक्यात येवू शकतो अशा हट्टांकडे, मग तो आई-वडिलांचा असो, मुला मुलींचा असो, पत्नीचा असो की नातवांचा असो, दुर्लक्ष करायचे असते हा बोध मात्र त्यांनी घेतला नव्हता.
गुरुवार, २३ जानेवारी, २०२५
पार्वती काकूंचे सुवर्णमृग
पार्वती काकू कपाळाला हात लावून बसल्या होत्या. रडून रडून त्यांची आसव सुद्धा सुकली होती. काय करावं? कोणाला सांगावं? कळत नव्हतं. पार्वती काकूंचे यजमान शंकरराव यांच अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅज्युएटीचे पैसे कंपनीने पार्वती काकूंच्या नावाने राष्ट्रीकृत बँकेत जमा केले होते. थोडी थोडकी रक्कम नव्हती. अगदी सहा लाख रुपये होती. बँकेच्या मॅनेजरने त्यांना सल्ला दिला की हे पैसे जर त्यांनी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले तर त्यांना दरमहा चांगलं व्याजही मिळेल व घर चालवायला मदतही होईल. पार्वती काकू तशा एकदमच अडाणी नव्हत्या. थोड्याफार शिकलेल्याही होत्या. आजूबाजूला जे काही घडतंय याची त्यांना जाण पण होती. कधी जमलं तर वर्तमानपत्र पण वाचायच्या. घरात टीव्ही तर होताच, त्याच्यावर बातम्या पण ऐकायच्या.
अगदी 'शेरेकर' पासून सुरुवात करून अगदी हल्ली हल्ली पर्यंत झालेल्या मल्टी लेयर मार्केटिंग मधील फसवणुकीच्या प्रकारांबद्दल त्यांना थोडीफार कल्पना देखील होती. पण तरीदेखील त्यांचा तरुण मुलगा प्रकाश याचा अतिशय जवळचा मित्र संतोष खंडेलवाल याने त्यांना गळ घातली. दर महिन्याला एक लाख रुपयाला पाच हजार रुपये व्याज अथवा परतावा मिळेल अशी 'गोल्डन डियर स्कीम' त्याने समजावून सांगितली. पार्वती काकूंना यावर आधी विश्वास बसत नव्हता त्यावेळी संतोष खंडेलवालने "काकू तुम्ही घाबरू नका. तुमच्या पैशाला मी गॅरेंटर आहे. पैसे बुडाले तर मी खिशातून देईन" असे आश्वासनही दिले होते. त्यामुळे पार्वती काकू निर्धास्त राहिल्या. आपल्या मुलाचा अगदी लहानपणापासूनचा जवळचा मित्र, विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आणि पैसे बुडालेच तर तो नक्की आणून देईल म्हणून पार्वती काकूंनी बँकेमधल फिक्स डिपॉझिट तोडल. सहा लाखापैकी पाच लाख रुपये त्यांनी आपल्या बचत खात्यात ठेवले व उरलेले एक लाख रुपये त्यांनी संतोष खंडेलवालला गोल्डन डियर स्कीम मध्ये ठेवण्यासाठी दिले.
एक महिना झाल्यानंतर स्वतः संतोष खंडेलवाल, सांगितल्याप्रमाणे ५ हजार रुपयाचा चेक घेऊन पार्वती काकूंच्या घरी पोहोचला. तो चेक बघून पार्वती काकूंचा हर्ष गगनात मावेना. त्यांनी संतोषला आधी चहा दिला आणि मग एका हाताने तो चेक घेतला तर दुसऱ्या हाताने आणखीन एक लाख रुपयाचा चेक गोल्डन ईगल स्कीम मध्ये ठेवण्यासाठी दिला. दुसऱ्या महिन्यात संतोष खंडेलवाल दहा हजार रुपये रुपयांचा चेक घेऊन पार्वती काकूंच्या घरी जेव्हा गेला तेव्हा पार्वती काकू त्याची वाटच बघत होत्या. यावेळी संतोष खंडेलवालला पार्वती काकूंनी चहाबरोबर पोहे देखील दिले व दहा हजाराचा चेक घेऊन आपल्या खात्यात उरलेले तीन लाख रुपये सुद्धा खंडेलवालच्या हवाली केले. पुढच्या महिन्यात आठ तारखेला नेहमीप्रमाणे खंडेलवाल परताव्याची रक्कम घेऊन येणार म्हणून पार्वती काकूंनी त्याच्यासाठी आधीपासूनच गोड शिरा करून ठेवला होता. खंडेलवालला गोड शिरा खूप आवडायचा. यावेळी त्याच्यासाठी काकूंनी शिऱ्यात थोड्या मनुका आणि काजू देखील टाकले होते. शेवटी मुलाचा अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र होता ना तो.
संध्याकाळचे सहा वाजले. सात वाजले. आठ वाजले. संतोष खंडेलवाल अजूनही आला नव्हता. पार्वतीकाकूंचा धीर सुटत चालला. त्यांनी प्रकाशला खंडेलवालला फोन करायला सांगितला. संतोष खंडेलवालचा फोन स्विच ऑफ येत होता. तेव्हा काकूंनी प्रकाशला खंडेलवालच्या घरी जाऊन चेक घेऊन यायला सांगितलं. प्रकाश खंडेलवालच्या घरी पोहोचला तेव्हा घरात संतोष नव्हता पण त्याचे वडील मात्र होते. वडील रडत होते. संतोष खंडेलवालची आई कोपऱ्यात गपचूप बसली होती. प्रकाशने काय झालं असं विचारतात संतोषच्या वडिलांनी पोलिसांनी संतोषला पकडून नेलं असं सांगितलं. गोल्डन डियर स्कीमच ऑफिस बंद झालं होतं. त्याचे मालक पळून गेले होते. गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोल्डन डियर स्कीमने ज्या ज्या लोकांना एजंट म्हणून नेमलं होतं त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती.
राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना सीता कुटीच्या दरवाज्यापाशी बसली होती. इतक्यात तिने एक सुवर्णमृग पाहिला. सुवर्णमृग पाहताच सीतेचे भान हरपले. त्याच्या
चमचमत्या सोनेरी कांतीने तिचे डोळे दिपले. या सुवर्णमृगाला जिवंत पकडावे, त्याला पाळावे व आपले मनोरंजन करावे असे
तिला वाटू लागले. जर का हा सुवर्णमृग जिवंत पकडला गेला
नाही तर त्याच्या चामड्याचे मृगासन करावे व त्यावर आपण श्रीरामासोबत बसावे असेही
तिला वाटू लागले. तशी इच्छाही सीतेने प्रभू रामाला बोलून
दाखवली. सीतेच्या सोबतीला नेहमीप्रमाणे
लक्ष्मण होताच त्यामुळे रामाला चिंता नव्हती. आपल्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीराम आपल्या कुटी बाहेर पडून सुवर्णमृगाला पकडण्यासाठी जंगलात निघून
गेला होता. बराच वेळ झाला तरी श्रीराम परतले नाहीत. इतक्यात लक्ष्मण आणि सीतेला दुःखी, कष्टी व वेदनेने व्याकुळ झालेल्या श्रीरामाच्या हाका ऐकू आल्या. त्यामुळे सीतेला वाटले की श्रीराम कुठल्यातरी संकटात आहेत. तिने लक्ष्मणाला श्रीरामाच्या मदतीला जाण्याची आज्ञा केली. लक्ष्मण हुशार होता.
हे सुवर्णमृग नसावे. मायावी असावे किंवा यात काहीतरी धोका असावा असा त्याला संशय होता. श्रीरामाला
पृथ्वीतलावर कोणीही हरवू शकत नाही किंवा मारू शकत नाही याची लक्ष्मणाला पूर्ण
खात्री होती परंतु सीता काही ऐकायला तयार नव्हती. सीतेने आग्रह नव्हे तर आज्ञाच केली होती म्हणाना. मोठ्या वहिनीची आज्ञा ही मातृआज्ञा असते. त्यामुळे मनात नसूनही लक्ष्मणाला सीतेला
कुटीतच सोडून रामाच्या मदतीला सीतेपासून दूर जावे लागले. आणि त्यानंतर जे घडले ते रामायण आपल्या सर्वांनाच माहित आहे.
मोह आणि लोभापाई मनुष्य आंधळा होतो आणि तारतम्याने विचार करणंच तो विसरून जातो. जिथे राष्ट्रीकृत बँका वर्षाला फक्त सहा टक्के परतावा देतात तिथे एक लाखाला महिन्याला पाच हजार रुपये म्हणजेच एक लाखाला वर्षाला साठ हजार रुपये परतावा मिळणे म्हणजे साठ टक्के परतावा मिळणे होय. सर्वसाधारण परताव्यापेक्षा दहापट अधिक परतावा मिळेल या सुवर्णमृगामागे लागणारे मूर्खच म्हणायला हवेत. कोणत्याही धंद्यात जर एवढा परतावा मिळत असेल तर माणसं दुसरा धंदा का बर करतील? आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा पडला आहे ते तो पैसा बँकेत सहा टक्के परताव्याने का बर ठेवतील? एवढा साधा विचार करणं देखील आपण सोडून देतो आणि जे खड्ड्यात पडतो ते कधीही न उठण्यासाठी.
पार्वती काकूंनी देखील रामायण वाचलं होतं पण त्यांच्या रामायणाच्या
पुस्तकातील नेमकं याच गोष्टीच पान गहाळ झाल होत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक' पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...
-
सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक' पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...
-
वेद , उपनिषद , पुराण , रामायण ते महाभारत जगातील सर्व ज्ञान वेदांमध्ये ठाई-ठाई भरलं आहे. ‘ ऋग्वेद ’, ‘ सामवेद ’, ‘ यजुर्वेद ’, ...
-
रावणाच्या अतृप्त ईच्छा आपण काहीतरी उद्योग करावा , धंदा करावा असं लक्ष्मण राव जोशी साहेबांना त्यांच्या तरुणपणी नेहमी वाटायचं. पण स...