रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

 

श्रावण बाळाचे खरे खलनायक



 

रात्री साडेदहा वाजता आपल्या चिन्मयी या एक वर्षाच्या नातीला खांद्यावर थापटून थोपटून झोपवल्यानंतर आपण स्वतः झोपेला जायच्या तयारीत असलेल्या यशवंत रावांचा फोन वाजू लागला. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? असा विचार करत यशवंत रावांनी फोन उचलला त्यावेळी दापोली मधील त्यांच्या गावावरून त्यांचे काका दुसऱ्या बाजूने बोलत होते. यशवंत राव व त्यांचे मोठे अविवाहित बंधू शंकर रावयशवंत रावांची पत्नी विद्या ताई, विवाहित मुलगा सुदेश व  सून मंगल  हे सारे एकत्र पनवेलमध्ये राहायचे तर त्यांचे ८८ वर्षाचे वृद्ध वडील वसंत राव दापोली मधील त्यांच्या गावातील वडिलोपार्जित घरात आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहायचे.  यशवंत रावांनी आपल्या वडिलांना म्हणजे वसंत रावांना, पनवेल येथे आपल्या बरोबरच राहावे म्हणून अनेक वेळा आग्रह केला, विनंती केली पण पत्नीच्या निधनानंतर वसंत राव हट्टाने आपल्या गावीच राहायला गेले. वसंत रावांचं लहानपण गावी गेलं असल्यामुळे त्यांना गावची ओढ होतीच पण त्याचबरोबर पनवेल मधलं मुलाच छोटसं घर, त्यात अनेक माणसं, आता त्यांना तिथे गर्दी-गर्दी वाटू लागली होती.

 

फोनच्या दुसऱ्या बाजूला यशवंत रावांचे काका, सुधाकर काका होते. अर्ध्या-एक तासापूर्वी वसंत रावांना अचानक छातीत दुखू लागलं होतं म्हणून सुधाकर काकांनी त्यांना ताबडतोब दापोली मधल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांचे उपचार चालू होते. तसं वय झालं होतं. प्रकृती नाजूक होती पण फारशी चिंता करायचं काही कारण नव्हतं.

 

फोनवरचा निरोप ऐकून यशवंत राव अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या घरच्या सर्वांना ही बातमी कळवली. सगळेच चिंताक्रांत झाले. पुढे काय करायचं हे ठरवू लागले.  घरात शंकर राव सर्वात मोठे.  त्यांनी आग्रह धरला की ताबडतोब गावी गेले पाहिजे.  बाबांवर म्हणजे वसंत रावांवर ताबडतोब चांगले उपचार होतात की नाही हे पाहिले पाहिजे.  एवढे होईस्तो रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते.  आता एवढ्या रात्री पनवेलवरून दापोलीला जायचं म्हणजे कसं जायचं हाच मोठा प्रश्न होता.  रात्री कोकणात जाणाऱ्या बसेस कधीच निघून गेल्या होत्या.  शेवटची सावंतवाडी पॅसेंजर पण पुढच्या दहा मिनिटात सुटणार होती. आणि दहा मिनिटात पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत जाणं शक्यच नव्हतं.  अशावेळी कारनेच गावी जाण हा एकमेव मार्ग होता. यशवंत रावांनी कोणीही ड्रायव्हर ठेवला नव्हता.  तसा कारचा फारसा उपयोगही नव्हता.  अतिशय क्वचित प्रसंगी यशवंत रावांचे कुटुंबीय जवळपास कुठे जाण्यासाठी किंवा एखादा लग्न समारंभ असेल तर त्याला जाण्यासाठी कारचा वापर करीत. यशवंत रावांव्यतिरिक्त त्यांच्या घरात फक्त त्यांच्या मुलालाच गाडी चालवता येत असे आणि आज तोही त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त नाशिकला निघून गेला होता.  आता गाडी स्वतः चालवत दापोलीला गावी जाणं हा एकमेव मार्ग यशवंत रावांसमोर होता. मोठे बंधू शंकर राव यांचा ताबडतोब निघण्याचा आग्रह तर होते पण शंकर राव स्वतः आजारी असल्यामुळे ते त्यांच्याबरोबर येऊ शकत नव्हते.

 

शेवटी निर्णय झाला व यशवंत राव स्वतः एकटेच गाडी घेऊन दापोलीला गावाकडे निघाले.  पनवेल ते दापोली हे साधारण २० किलोमीटरचे अंतर कारने कापायला पाच तास तर नक्कीच लागणार होते. त्यामुळे सकाळी साडेचार-पाच पर्यंत आपण पोहोचू असे यशवंत रावांना वाटले आणि ते गाडी घेऊन गावाकडे निघाले.  चिंताक्रांतमनात काळजी व डोळ्यात नाही म्हटलं तरी थोडीशी झोप असलेले वर्षाचे यशवंत राव मुंबई-गोवा महामार्गावरून दापोलीकडे निघाले.  मनात अनेक शंका उत्पन्न होत होत्या. विचारांच काहूर माजलं होतं आणि अशा तंद्रीत असतानाच जे होऊ नये तेच झालं.  रस्त्यावर असलेला एक मोठा खड्डा रात्र असल्याने अंधारात यशवंत रावांना दिसला नाही. त्या खड्ड्यात गाडी घुसून पुन्हा जेव्हा वर आली तेव्हा यशवंत रावांचा गाडीवरचा कंट्रोल गेला होता. - च्या स्पीडने धावणारी ती गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडावर आदळली आणि  अपघात झाला.  सुदैवाने डोक्याला मार लागला, पाय फ्रॅक्चर झाला व एका बरगडीला दुखापत झाली एवढ्यावर वाचलं म्हणायचं पण यशवंत रावांच्या जीवाला धोका झाला नाही.  पुढे  चार-पाच दिवसातच यशवंत रावांचे वडील वसंत राव हे ठीक होऊन घरी परतले पण यशवंत राव मात्र दोन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

 

प्रभू रामचंद्रांचे वडील आणि अयोध्येचे 'महाराज दशरथ यांना देखील इतर सर्व राजांप्रमाणे शिकारीचा छंद होता.  त्यावेळी शिकार हा एक क्रीडा प्रकार होता.  आपली नेमबाजी, धनुर्विद्या, धाडस व साहस दाखवण्याचा तो एक  प्रकार होता.  शिकार करतेवेळी कित्येक वेळा जीव धोक्यात घालावा लागायचा. त्यामुळे असा धोका पत्करण्याच्या तयारीचाही कस लागायचा.  एक दिवस अशाप्रकारे शिकार करायला निघालेले राजा दशरथ  त्यांच्यासोबत आलेल्या इतर मंडळींपासून वेगळे पडले. रात्र झाली. त्यामुळे जंगली जनावरांपासून बचाव करण्यासाठी राजा दशरथ एका झाडावर चढून बसले. झाडापासून जवळच एक पाणथळ जागा होती. तलावच होता म्हणाना. त्या तलावावर रात्री पाणी पिण्यासाठी जंगली जनावरे देखील येत.  त्यामुळे रात्री एखादी चांगली शिकारही होऊ शकते हे लक्षात ठेवून राजा दशरथ आपल्या धनुष्याला प्रत्यंच्या लावून अगदी सावध बसले होते. 


त्याचवेळी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना काशीयात्रा घडवून आणण्यासाठी त्यांना कावडीत बसून नेणारा श्रावण बाळ तेथूनच चालला होता. रात्र झाली म्हणून  त्याने एका सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता.  रात्री आई-वडिलांना तहान लागली. त्यांनी श्रावण बाळाकडे पाणी पिण्याची इच्छाही बोलून दाखवली.  सोबत असलेल्या मडक्यातली पाणी संपले होते. अशावेळी कुठून तरी पाणी आणणे व आई-वडिलांची इच्छा पूर्ण करणे हे श्रावण बाळाला आपले कर्तव्य वाटले.  तसं त्यावेळी ती सुरक्षित जागा सोडून रात्रीच्या किर्र अंधारात आणि विशेषतः त्या भयभीत करणाऱ्या अपरिचित जंगलात पाणी शोधायला जाणं धोक्याचंच होतं. पण श्रावण बाळाने हा धोका पत्करायचं ठरवलं. आणि तो एक मातीच मडकं घेऊन पाणी शोधायला बाहेर पडला.  काही वेळातच त्याला जवळच असलेला एक तलाव दिसला.  त्या तलावातून मडक्याच्या साहाय्याने पाणी भरत असताना आलेला आवाज जवळच असलेल्या राजा दशरथाच्या कानी पडला. राजा दशरथाला वाटले की कोणीतरी जंगली जनावर पाणी पित आहे.  आवाजाच्या दिशेने राजा दशरथाने जो बाण सोडला तो श्रावण बाळाला वर्मी लागला व तो घायाळ झाला.  पुढे काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

 

दुसऱ्या  गोष्टीत रात्री आई-वडिलांना तहान लागली म्हणून भावनेच्या आहारी जाऊन अनोळखी निबिड अरण्यात जंगली श्वापदे असू शकतात हे माहीत असून सुद्धा श्रावण बाळ पाणी आणायला गेला.  रात्री तसं गरम तर नक्कीच होत नसतं.  रात्रभर पाणी मिळालं नाही म्हणून आई-वडिलांचं फार काही बिघडलं असतं असं नाही.  त्यामुळे पाण्यासाठी रात्रभर आई-वडील थांबले असते तरी चाललं असतं.  पण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्रावण बाळाकडे पाण्यासाठी हट्ट धरला व त्याला संकटात लोटलं.  श्रावण बाळाने देखील डोक्याने विचार न करता भावनेने विचार केला व तो संकटाला स्वतःहून सामोरा गेला.  यात जशी श्रावण बाळाची चूक आहे तशी श्रावण बाळाच्या आई वडिलांची अधिक चूक आहे.  राजा हरिश्चंद्राच्या बाणाने श्रावण बाळ मृत्युमुखी पडला हे जरी सत्य असलं तरी जर राजा हरिश्चंद्र तिथे नसता तर एखाद्या वाघ, सिंह किंवा कोल्या-लांडग्याच्या कळपाने देखील श्रावण बाळाचा फडशा पाडला असता किंवा सर्प दंशाने देखील श्रावण बाळाचा मृत्यू होवू शकला असता  हे देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे श्रावण बाळाच्या कथेत राजा हरिश्चंद्राला खलनायक बनवणं मला तरी मान्य नाही.  खरे खलनायक स्वतःच्या तहानेवर काबू न ठेवू शकणारे व ऐन रात्री आपल्या मुलाला आपल्या हट्टापायी संकटात घालणारे श्रावण बाळाचे आई वडीलच आहेत.

 

तर पहिल्या  गोष्टीत यशवंत रावांना हट्टापायी ऐन रात्री एकटे कार चालवत गावी पाठवणारे त्यांचे कुटुंबीय खलनायक आहेत.  ८८  वर्षाच्या वडिलांना यशवंत रावांनी आपल्याबरोबर राहावं म्हणून सांगितलं होतं. पण वसंत रावांनी गावीच राहायचं ठरवलं. हा त्यांचा निर्णय होता आणि त्या निर्णयांबरोबर येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींना तेच जबाबदार होते.  ८८ व्या वर्षी वृद्धांची तब्येत वर-खाली होणारच. अशा वेळी आपण तिकडे ताबडतोब पोहोचल्यानंतर त्यांच्या तब्येतीत आपण काही फरक घडवून आणणार आहोत का? आपण त्यांना काही वेगळे उपचार देणार आहोत का? आपण त्यांचे प्राण वाचवणार आहोत का? या सर्व प्रश्नांची नकारात्मक उत्तरे असून देखील केवळ लोकोपवादासाठीइतर कुटुंबीयांना बरे वाटावे म्हणून किंवा कोणी आपल्याला नाव ठेवू नयेत म्हणून रात्रीच्या प्रवासाचं अकारण धाडस करणारे यशवंत राव व त्यांचे पनवेलमधील कुटुंबीय या अपघाताला जबाबदार आहेत.

 

अपघात घडतात त्याला जी अनेक कारणे असतात त्यातील मुख्य कारण म्हणजे एक, अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होणे.  दोन, अशा परिस्थितीला पोषक असे वातावरण तयार होणे  आणि तीन म्हणजे तारतम्य भावाच्या अभावाने आतताई निर्णय घेऊन अपघाताला स्वतःहून आमंत्रण देणे.

 

प्रसंग सर्वांवर येतात. प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचे असते.  तारतम्याने विचार करायचा असतो.  मन आणि बुद्धी दोन्ही शाबूत ठेवून निर्णय घ्यायचा असतो.  जेव्हा मन बुद्धीपेक्षा वरचढ होते त्यावेळी बहुतेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात पण जेव्हा बुद्धीने निर्णय घेतले जातात त्यावेळी ते अनेक वेळा अचूक करतात ठरतात.

 

कोणताही निर्णय घेताना त्या निर्णयामागे असलेल्या धोक्यांचाही विचार करणं गरजेचं आहे.  संकटे ठाई-ठाई उभी असतात.  ती आपण टाळू शकत नाही किंवा ती सारी संकटे नष्टही करू शकत नाही.  परंतु आपल्या मार्गात ही संकटे येणार नाहीत असा मार्ग निवडण मात्र आपल्या हातात असतं.  हा मार्ग जरी पूर्णपणे संकट मुक्त नसला तरी आपण बऱ्याच प्रमाणात या मार्गावरील अनेक संकटे कमी करू शकतो व जोखीमही कमी करू शकतो. 


यशवंत रावांनी रामायणाच्या सुरुवातीलाच येणारी श्रावण बाळाची कथा ऐकली होती.  ती कथा ऐकताना त्यांना रडूही कोसळले होते.  त्या श्रावण बाळाच्या वयोवृद्ध आई-वडिलांबद्दल त्यांना अतिव सहानुभूती देखील वाटली होती.  पण श्रावण बाळाच्या या कथेतील खलनायक ऐन जंगलात असताना पाण्यासाठी रात्री-अपरात्री मुलाकडे हट्ट धरणारे श्रावण बाळाचे आई-वडीलच होते हे यशवंत रावांच्या लक्षात आले नव्हते. अशा हट्टांकडे, विशेषत जो हट्ट पुरवताना आपला जीव धोक्यात येवू शकतो अशा हट्टांकडे, मग तो आई-वडिलांचा असो, मुला मुलींचा असो, पत्नीचा असो की नातवांचा असो, दुर्लक्ष करायचे असते हा बोध मात्र त्यांनी घेतला नव्हता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक'       पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.   तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...