सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

 

रावणाच्या अतृप्त ईच्छा





आपण काहीतरी उद्योग करावा, धंदा करावा असं 
लक्ष्मण राव जोशी साहेबांना त्यांच्या तरुणपणी नेहमी वाटायचं.  पण सुदैवाने त्यांना खूप तरुणपणीच चांगली 'सरकारी' नोकरी लागली व त्यांचे हे उद्योग-धंदा करण्याचे स्वप्न हवेत विरलेजॉब आरामाचा होता व मोठ्या अधिकाराचा ही. नियमितपणे दर एक तारखेला येणारा पगार, ऑफिसमध्ये जायला-यायला सरकारी गाडी आणि शासकीय वसाहतीत एक मोठा फ्लॅट यामुळे जोशीसाहेब इंडस्ट्री डिपार्टमेंट मध्ये जे चिकटले ते वयाच्या 58 व्या वर्षीच निवृत्त होईपर्यंत चिटकून राहिले.

 

परंतु आपल्या मनातली धंदा करावा ही इच्छा त्यांनी अनेकदा त्यांचा मुलगा राहुल याला बोलून दाखवली होती.  राहुल इंजिनीयर होता. हुशार होता व मेहनती देखील होता.  त्यालाही वाटे की नोकरीत काय लागून राहिल आहे? मोठं व्हायचं असेल तर धंदाच करण भाग आहे. त्यामुळे तो नोकरी करण्याच्या भानगडीतच पडला नाही व त्याने आपला छोटा-मोठा धंदा सुरू केला. जसं सर्वांच्या बाबतीत घडतं तसंच त्याच्या बाबतीत घडलं. छोटा-मोठा धंदा तर कोणीही करेल पण जर धंदा वाढवायचा ठरवला तर मात्र थोड्या ओळखी हव्यातच. नशिबाने  जोशीसाहेब इंडस्ट्री डिपार्टमेंट मध्येच मोठे अधिकारी होते. अनेक कंपन्यांशी त्यांचा संबंध यायचा. अनेक कंपन्यांना त्यांनी मदत पण केली होती. कंपन्यांच्या अडचणीच्या वेळी जोशीसाहेब त्यांना मदत करायचे त्यामुळे त्यांचे नावही चांगले होते. राहुल नेहमी बाबांना सांगायचा की "बाबा, अ'लंका'र कंपनीमध्ये माझ्या धंद्याला काम मिळू शकत.  जरा तुम्ही बोललात तर बर होईल". जोशी साहेब नेहमीच बिझी असायचे. राहुलला ते काही ना काही कारण द्यायचे. अरे आज,  अरे उद्या फोन करतो रे. अरे परवा भेटायला जाऊ रे. अरे पुढच्या आठवड्यात त्याला बोलून घेऊ रे. असं काही ना काही सांगत. शेवटी राहुलच कंटाळला आणि त्यांनी बाबांना विचारणच बंद केल.

  

राहुलचा धंदा टुकूटुकू चालू होता आणि यथावकाश लक्ष्मण राव जोशीसाहेब 'इंडस्ट्री डिपार्टमेंट' मधून निवृत्त झाले. आता कायजोशी साहेबांना वेळच वेळ होता. एक दिवस त्यांनी स्वतःहून राहुलकडे विषय काढला आणि म्हणाले चल, आपण त्या अ'लंका'र कंपनीच्या मालकाला भेटूया आणि तुझ्या धंद्याबद्दल बोलू या. जोशी साहेबांनी आपल्या डायरीतून त्या अ'लंका'र कंपनीचे  मालक बालाजी लंकेश्वर यांचा नंबर शोधून काढला व आपल्या मोबाईल वरून त्यांना लावला. टेलिफोनवर तिकडून जोशी साहेबांच स्वागत झालं आणि 'कधीही चहा प्यायला या' असं निमंत्रणही मिळालं. या निमंत्रणाने खुश झालेले  जोशीसाहेब दुसऱ्याच दिवशी राहुलला घेऊन त्यांच्या घरापासून 18 किलोमीटर लांब असलेल्या अ'लंका'र कंपनीच्या फॅक्टरीत गेले.  


अ'लंका'र कंपनीचे मालक बालाजी लंकेश्वर त्या दिवशी खूप बिझी असावेत. त्यामुळे जोशी साहेबांना पाऊण तास त्यांची वाट पहावी लागली. यावेळेत लंकेश्वरनी  आपल्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या चहापाण्याची व सोबत  बिस्किटांची सोय केली होती ही त्यातल्या त्यात जोशी साहेबांना खुश करणारी गोष्ट होती. पाऊण तासानंतर  जोशी साहेब लंकेश्वरच्या केबिनमध्ये राहुल सोबत घुसले त्यावेळी लंकेश्वरनी  'या कानापासून त्या कानापर्यंत' हसून त्यांचं स्वागत केलं व त्यांना थांबून राहायला लागल्याबद्दल खेदही व्यक्त केला.  थोडा वेळ अवांतर गप्पा झाल्यानंतर  जोशी साहेबांनी राहुलच्या धंद्यासंदर्भातील विषय काढला. हो-हो, अवश्य-अवश्य म्हणत लंकेश्वरन नी त्यांना भले मोठे लाल लाल  गाजर हातात दिले व धंद्याचा हा भाग त्यांचा पार्टनर बिभीषण पटेल पाहतो असे सांगून 'मी माझ्या पार्टनरशी बोलून राहुलला फोन करून कळवतो व त्यांची भेट घालून देतो' असे आश्वासनही दिले.

 

या गोष्टीला आता तीन वर्षे पूर्ण होत आली. आजपर्यंत राहुलला बालाजी लंकेश्वरन चा फोन आला नाही. जेव्हा कधी राहुलने वा  जोशी साहेबांनी लंकेश्वन ना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या पीए ने बालाजी लंकेश्वर जागेवर नाहीत असाच निरोप दिला.


राम-रावण युद्धाच्या शेवटी रावण धारातीर्थी पडला होता व शेवटच्या घटका मोजत होता अशावेळी लक्ष्मणाला थोडासा गर्व झाला होता. आपले 
बाहू फुगवून,  छाती पुढे काढून व मान वर करून तो आजूबाजूला पाहत होता. प्रभू रामाच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने लक्ष्मणाला म्हटले लक्ष्मणा, युद्ध आता संपले आहे. रावणही आता शेवटच्या घटका मोजत आहे. जरी तो आपला शत्रू होता तरी तो एक महान योद्धा होता. शिवभक्त होता. लंकेचा राजा होता. युद्ध संपले आणि वैरही संपले. तू आता तो जेथे पडला आहे तेथे जा, बघ व ऐक तो काय बोलतोय ते.  कदाचित मृत्यूपूर्वी तो तुला काही महत्त्वाचं सांगेल सुद्धा

 

लक्ष्मणाला अशा वेळी रावणाकडे जाणे व त्याला भेटणे काही रुचले नाही. परंतु मोठ्या भावाची, प्रत्यक्ष प्रभू श्री रामाची आज्ञा आहे म्हणून नाईलाजाने का होईना लक्ष्मण रणभूमीकडे, जिथे रावण धारातीर्थी पडला होता तिथे पोहोचला.

 

लक्ष्मणाला पाहताच मरणासन्न रावण थोडासा सावरला व त्याने लक्ष्मणाला येण्याचे कारण विचारले. रामाची आज्ञा आहे म्हणून आलो. बाकी काही नाही. मरण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचं असेलर सांगा. मी तुमचा निरोप श्रीरामाला सांगेन असं थोडंस उर्मट उत्तर लक्ष्मणाने दिल.

 

रावण खिन्न हसला   म्हणाला हे लक्ष्मणा, अरे खूप इच्छा होती रेहा सतत खवळणारा समुद्र कायमचा शांत करून टाकावा.  त्याच्या पाण्याचा लोकांना काहीही उपयोग नाही रे. ते सार खारट पाणी गो करून टाकावं. पण आज करू उद्या करू असं म्हणत ते राहूनच गेलं. संपूर्ण खारा समुद्र गोड करण्याची शक्ती होती रे माझ्याकडे. पण जे राहून गेल ते राहून गेलं.

 

असं वाटायचं की या पृथ्वीवरच्या सर्व मानवांना अगदी सहजगत्या स्वर्गापर्यं पोहोचता यावं म्हणून पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक शिडी तयार करावी. पण आज करू, उद्या करू असं म्हणत ते राहूनच गेल. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत शिडी बांधायची शक्ती होती रे माझ्याकडे. पण ते राहूनच गेलं. लक्ष्मणा, आज मीच असा शक्तीहीन अवस्थेत इथे पडून आहे. आता मला तर फारसं बोलता ही येत नाही. आता मनात जी काम करायची होती ती राहून गेली. आता मी ती कशी काय करू?”

 

जोपर्यंत आपल्याकडे शक्ती असते तोपर्यंतच कार्यसिद्धी होऊ शकते, काम होऊ शकत. आपण निर्णय घेऊ शकतो. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो. एकदा का  आपण शक्तीहीन झालो किंवा वेळ टाळून गेली की मनात असलं तरी आपण ती काम करू शकत नाही. एखाद्या मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला विचारा. जी त्याच्या कार्यकाळात काम राहून गेली आहेत तो ती आता करू शकतो का? त्याचे उत्तर नाही अस असणार. कारण आता त्याच्यातील शक्ती निघून गेली आहे. जी खुर्चीची पॉवर होती ती निघून गेली आहे. जर एखाद्याला नर्मदा परिक्रमा करायचं असेल तर त्याने ती तरुण वयातच केली पाहिजे चारधाम यात्रा देखील तरुणपणातच केली पाहिजे. आज करू, उद्या करू म्हणून जर या यात्रा राहून गेल्या तर ज्या वयात चालणं अशक्य होतं, थोडसं चाललं तर धाप लागते, अनेक रोगांनी शरीरात घर केलेलं असतं अशावेळी या यात्रा आपण करू शकू का? म्हणून आजचं काम आजच केलं पाहिजे आणि जमलं तर उद्याचही काम आजच संपवलं पाहिजे. नाहीतर आपली गतदेखील धारातीर्थी पडलेल्या रावणासारखी होऊ शकते. 

 

रात्री झोपायच्या आधी लक्ष्मणराव जोशी साहेबांना त्यांचे बाबा नेहमी चांगल्या चांगल्या कथा सांगत.  बहुदा रावणाची ही कथा सांगायची त्यांच्याकडून राहून गेलेली असावी.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक'       पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.   तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...