पार्वती काकूंचे सुवर्णमृग
पार्वती काकू कपाळाला हात लावून बसल्या होत्या. रडून रडून त्यांची आसव सुद्धा सुकली होती. काय करावं? कोणाला सांगावं?
कळत नव्हतं. पार्वती काकूंचे यजमान शंकरराव यांच अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड
व ग्रॅज्युएटीचे पैसे कंपनीने पार्वती काकूंच्या नावाने राष्ट्रीकृत बँकेत जमा केले होते. थोडी थोडकी रक्कम नव्हती. अगदी सहा लाख रुपये होती. बँकेच्या मॅनेजरने त्यांना सल्ला दिला की हे पैसे जर त्यांनी फिक्स
डिपॉझिट मध्ये ठेवले तर त्यांना दरमहा चांगलं व्याजही मिळेल व घर चालवायला मदतही
होईल. पार्वती काकू तशा एकदमच अडाणी नव्हत्या. थोड्याफार शिकलेल्याही होत्या. आजूबाजूला जे काही
घडतंय याची त्यांना जाण पण होती. कधी जमलं तर वर्तमानपत्र
पण वाचायच्या. घरात टीव्ही तर होताच,
त्याच्यावर बातम्या पण ऐकायच्या.
अगदी 'शेरेकर' पासून सुरुवात करून अगदी हल्ली हल्ली पर्यंत
झालेल्या मल्टी लेयर मार्केटिंग मधील फसवणुकीच्या प्रकारांबद्दल त्यांना थोडीफार
कल्पना देखील होती. पण तरीदेखील त्यांचा तरुण मुलगा प्रकाश याचा अतिशय जवळचा मित्र संतोष खंडेलवाल
याने त्यांना गळ घातली. दर महिन्याला एक लाख रुपयाला पाच
हजार रुपये व्याज अथवा परतावा मिळेल अशी 'गोल्डन डियर स्कीम' त्याने समजावून सांगितली. पार्वती काकूंना यावर आधी विश्वास बसत नव्हता त्यावेळी संतोष खंडेलवालने "काकू
तुम्ही घाबरू नका. तुमच्या पैशाला मी गॅरेंटर आहे. पैसे बुडाले तर मी खिशातून देईन" असे आश्वासनही दिले होते. त्यामुळे पार्वती काकू निर्धास्त राहिल्या.
आपल्या मुलाचा अगदी लहानपणापासूनचा जवळचा मित्र, विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आणि पैसे बुडालेच तर
तो नक्की आणून देईल म्हणून पार्वती काकूंनी बँकेमधल फिक्स डिपॉझिट तोडल. सहा लाखापैकी पाच लाख
रुपये त्यांनी आपल्या बचत खात्यात ठेवले व उरलेले एक लाख रुपये त्यांनी संतोष खंडेलवालला
गोल्डन डियर स्कीम मध्ये ठेवण्यासाठी दिले.
एक महिना झाल्यानंतर स्वतः संतोष खंडेलवाल, सांगितल्याप्रमाणे ५ हजार रुपयाचा चेक घेऊन पार्वती
काकूंच्या घरी पोहोचला. तो चेक बघून पार्वती काकूंचा हर्ष गगनात मावेना.
त्यांनी संतोषला आधी चहा दिला आणि मग एका हाताने तो चेक घेतला तर दुसऱ्या
हाताने आणखीन एक लाख रुपयाचा चेक गोल्डन ईगल स्कीम मध्ये ठेवण्यासाठी दिला. दुसऱ्या
महिन्यात संतोष खंडेलवाल दहा हजार रुपये रुपयांचा चेक घेऊन पार्वती काकूंच्या घरी जेव्हा
गेला तेव्हा पार्वती काकू
त्याची वाटच बघत होत्या. यावेळी संतोष खंडेलवालला
पार्वती काकूंनी चहाबरोबर पोहे देखील दिले व दहा हजाराचा चेक घेऊन आपल्या खात्यात
उरलेले तीन लाख रुपये सुद्धा खंडेलवालच्या हवाली केले. पुढच्या महिन्यात आठ
तारखेला नेहमीप्रमाणे खंडेलवाल परताव्याची रक्कम घेऊन येणार म्हणून पार्वती काकूंनी
त्याच्यासाठी आधीपासूनच गोड शिरा करून ठेवला होता.
खंडेलवालला गोड शिरा खूप आवडायचा. यावेळी त्याच्यासाठी काकूंनी शिऱ्यात थोड्या मनुका आणि काजू देखील टाकले होते. शेवटी मुलाचा अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र
होता ना तो.
संध्याकाळचे सहा वाजले. सात वाजले. आठ वाजले. संतोष खंडेलवाल अजूनही आला नव्हता. पार्वतीकाकूंचा धीर
सुटत चालला. त्यांनी प्रकाशला खंडेलवालला फोन करायला
सांगितला. संतोष खंडेलवालचा फोन स्विच ऑफ येत होता. तेव्हा काकूंनी प्रकाशला खंडेलवालच्या घरी जाऊन चेक
घेऊन यायला सांगितलं. प्रकाश खंडेलवालच्या घरी पोहोचला
तेव्हा घरात संतोष नव्हता पण त्याचे वडील मात्र होते.
वडील रडत होते. संतोष खंडेलवालची आई कोपऱ्यात गपचूप बसली होती. प्रकाशने काय झालं असं विचारतात संतोषच्या वडिलांनी पोलिसांनी संतोषला पकडून नेलं असं सांगितलं. गोल्डन डियर स्कीमच ऑफिस
बंद झालं होतं. त्याचे मालक पळून गेले होते. गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोल्डन डियर स्कीमने ज्या
ज्या लोकांना एजंट म्हणून नेमलं होतं त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती.
राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना सीता कुटीच्या दरवाज्यापाशी बसली होती. इतक्यात तिने एक सुवर्णमृग पाहिला. सुवर्णमृग पाहताच सीतेचे भान हरपले. त्याच्या
चमचमत्या सोनेरी कांतीने तिचे डोळे दिपले. या सुवर्णमृगाला जिवंत पकडावे, त्याला पाळावे व आपले मनोरंजन करावे असे
तिला वाटू लागले. जर का हा सुवर्णमृग जिवंत पकडला गेला
नाही तर त्याच्या चामड्याचे मृगासन करावे व त्यावर आपण श्रीरामासोबत बसावे असेही
तिला वाटू लागले. तशी इच्छाही सीतेने प्रभू रामाला बोलून
दाखवली. सीतेच्या सोबतीला नेहमीप्रमाणे
लक्ष्मण होताच त्यामुळे रामाला चिंता नव्हती. आपल्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीराम आपल्या कुटी बाहेर पडून सुवर्णमृगाला पकडण्यासाठी जंगलात निघून
गेला होता. बराच वेळ झाला तरी श्रीराम परतले नाहीत. इतक्यात लक्ष्मण आणि सीतेला दुःखी, कष्टी व वेदनेने व्याकुळ झालेल्या श्रीरामाच्या हाका ऐकू आल्या. त्यामुळे सीतेला वाटले की श्रीराम कुठल्यातरी संकटात आहेत. तिने लक्ष्मणाला श्रीरामाच्या मदतीला जाण्याची आज्ञा केली. लक्ष्मण हुशार होता.
हे सुवर्णमृग नसावे. मायावी असावे किंवा यात काहीतरी धोका असावा असा त्याला संशय होता. श्रीरामाला
पृथ्वीतलावर कोणीही हरवू शकत नाही किंवा मारू शकत नाही याची लक्ष्मणाला पूर्ण
खात्री होती परंतु सीता काही ऐकायला तयार नव्हती. सीतेने आग्रह नव्हे तर आज्ञाच केली होती म्हणाना. मोठ्या वहिनीची आज्ञा ही मातृआज्ञा असते. त्यामुळे मनात नसूनही लक्ष्मणाला सीतेला
कुटीतच सोडून रामाच्या मदतीला सीतेपासून दूर जावे लागले. आणि त्यानंतर जे घडले ते रामायण आपल्या सर्वांनाच माहित आहे.
मोह आणि लोभापाई मनुष्य आंधळा होतो आणि तारतम्याने
विचार करणंच तो विसरून जातो. जिथे राष्ट्रीकृत बँका वर्षाला फक्त सहा टक्के परतावा देतात तिथे एक लाखाला
महिन्याला पाच हजार रुपये म्हणजेच एक लाखाला वर्षाला साठ हजार रुपये परतावा मिळणे
म्हणजे साठ टक्के परतावा मिळणे होय. सर्वसाधारण
परताव्यापेक्षा दहापट अधिक परतावा मिळेल या सुवर्णमृगामागे लागणारे मूर्खच
म्हणायला हवेत. कोणत्याही धंद्यात जर एवढा परतावा मिळत असेल
तर माणसं दुसरा धंदा का बर करतील? आणि ज्यांच्याकडे अमाप
पैसा पडला आहे ते तो पैसा बँकेत सहा टक्के परताव्याने का बर ठेवतील? एवढा साधा विचार करणं देखील आपण सोडून देतो आणि जे खड्ड्यात पडतो ते कधीही
न उठण्यासाठी.
पार्वती काकूंनी देखील रामायण वाचलं होतं पण त्यांच्या रामायणाच्या
पुस्तकातील नेमकं याच गोष्टीच पान गहाळ झाल होत.