बुधवार, २२ जानेवारी, २०२५

 

शबरीची न उष्टवलेली बोरे

 

अश्विन भाई आपल्या कार्यालयात बसून काम करण्यात गढून गेले होते. तसा त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असायचा. धंदा वाढला होता आणि म्हणावे तेवढे कुशल कामगार कारखान्यासाठी मिळत नव्हते.  त्यामुळे अश्विन भाईंचा बहुतेक वेळ कारखान्यात कामगारांना ट्रेनिंग देण्यात व त्यांची सुपरविजन करण्यातच जायचा. जेवढा वेळ उरेल तेवढा वेळ कार्यालयात बसून ते बँक, पत्रव्यवहार, हिशोबदी व्यवहार पाहत.

 

सावंत मास्तर त्यांच्या कार्यालयात कित्येक वर्षापासून हिशोबाच काम पाहत. बँकेचे व्यवहारही तेच पाहत. अनेक दिवसापासून देणेकर्‍यांनी पैसे मागायला सुरुवात केली होती.  कालच बँकेत पैसेही आले होते म्हणून सावंत काकांनी अनेकांचे चेक बनवून अश्विन भाईंच्या सहीसाठी त्यांच्या टेबलवर ठेवले होते.

 

अश्विन भाईंचे जेव्हा त्या चेककडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी आपला ड्रॉवर उघडला व त्यातील पेन शोधायला सुरुवात केली. शोधाशोध केल्यानंतर एक पेन मिळालं पण त्यातील रिफील संपल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नव्हता.  त्यांनी बेल दाबली व रघु शिपाई आता आला.

 

जारे जरा नवीन बॉलपेन घेऊन ये अश्विन भाईंनी त्याला ऑर्डर दिली. त्या सरशी रघु शिपाई चटकन ऑफिसच्या बाहेर गेला आणि जवळच असलेल्या एका दुकानातून त्याने एक बॉलपेन विकत घेतले.  बॉलपेन घेऊन रघु धावत धावतच अश्विन भाईंच्या केबिनमध्ये घुसला व ते बॉलपेन त्याने अश्विन भाईंना दिले.

 

अश्विन भाईंनी बॉलपेनचे झाकण उघडले आणि झटक्यात त्यांनी त्यातील पहिल्या चेकवर सही केली. पण बघतात तो काय, ते बॉलपेन लाल शाईचे होते. बँकेत लाल शाई चालत नव्हती. तो चेक फुकट गेला. पुढे अश्विन भाई ना राग आला, ते रघु शिपायावर रागावले वगैरे वगैरे या गोष्टीला फारसा अर्थ नाही. अश्विन भाईंना बॉलपेन देण्यापूर्वी ते चालते का? ते कोणत्या रंगाचे आहे? हे रघु शिपायाने तपासायला हवे होते. या सर्वांची खात्री झाल्यावरच आपले वरिष्ठ असलेल्या अश्विन भाईंना रघु शिपायाने ते पेन दिले पाहिजे होते.  

 

प्रभू रामचंद्र आपल्या झोपडीत येणार हे ऐकून खुश झालेल्या शबरीला त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं.  परंतु शबरी पडली एक गरीब वनवासी महिला.  एवढ्या मोठ्या अयोध्येच्या राजपुत्राला नव्हे अयोध्येच्या राजाला काय द्यायचं हे तिलाच कळत नव्हतं.  शेवटी तिच्या झोपडीसमोर एक बोराच भलं मोठं झाड होतं. झाडाला टपोरी आंबट गोड बोर लागली होती. काळपट लाल रंगाची बोरं चवीला खूप सुंदर होती. पण त्यातील काही बोरं आंबट देखील असायची.  ही बोर आपण प्रभू रामाला खायला देऊ असा शबरीने विचार केला. पण त्याच वेळी तिच्या मनात असा ही विचार आला की जर यातील काही बोर आंबट निघाली तरमाझ्या प्रभू रामाची चव बिघडेल. तो दुःखी होईल. त्याला गोड बोरच दिली पाहिजेत. त्यामुळे शबरीने प्रत्येक बोर चावून बघितलं. जी बोर आंबट होती ती बाजूला काढली व केवळ गोड बोर एकत्र करून प्रभू रामाला अर्पण केली.

 

शबरीने उष्टावलेली ही बोर देखील प्रभू रामचंद्राने मोठ्या आवडीने व प्रेमाने खाल्ली कारण शबरीच्या त्या उष्टावण्यामागे चांगला उद्देश होता. या उद्देशापुढे ती बोरं उष्टवली गेली आहेत ही बाब गौण ठरली  आणि शबरी इतिहासात अमर झाली.

 

आपल्याकडे पाहुणे येतात त्यांच्यासाठी आपण चहा, फराळ आणि अगदी जेवण सुद्धा करतो. अशावेळी चहामध्ये साखर नीट पडली आहे ना? जास्त किंवा कमी नाही ना? हे चहा देण्याआधी तपासून पाहिला नको का? भाजीत किंवा आमटीत मीठ किंवा मसाला कमी जास्त तर नाही ना? हे आधी चाखून पाहायला नको का? आपण जे पत्र तयार करतो, जो रिपोर्ट तयार करतो किंवा आपल्या वरिष्ठांना देण्यासाठी जी काही कागदपत्रे तयार करतो ती त्यांना देण्यापूर्वी पुन्हा-पुन्हा काळजीपूर्वक वाचून त्यातील चुका दुरुस्त करून व त्यातील मजकूर अगदी बरोबर आहे ना याची खात्री करून  घ्यायला नको का? शबरीची कथा नुसती ऐकली नाही तर जर नीट ऐकली तर प्रभू रामचंद्र आपल्यावर नेहमीच कृपा करेल याची खात्री बाळगा.

 

अश्विन भाईंच्या कार्यालयातील रघु शिपायाने  सुद्धा जर शबरीच्या गोष्टी मागील भाव समजावून घेतला असता तर त्यालाही अमर होण्याची संधी होती पण ती आता चुकलीच म्हणा ना. पण मला माहित आहे की रघु शिपायाच्या आईने त्याला शबरीची गोष्ट लहानपणी नक्कीच सांगितली होती पण शबरीच्या गोष्टीतील अर्थ मात्र त्याला समजावून सांगितला नव्हतारघु शिपायाला शबरीची गोष्ट माहीत होती पण त्या मागील बोध मात्र माहीत नव्हता त्यामुळे रघुला अश्विन भाईंच्या शिव्या खाव्या लागल्या.

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक'       पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.   तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...